गडचांदूर, दि. २७ जुलै : दिल्ली येथील जंतर-मंतरवर नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने उभारलेल्या आंदोलनाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ मिठाई वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन मदनदादा बोरकर व मधुभाऊ चुनारकर यांनी केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारामुळे मानसिक आघात सहन न झाल्याने आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर झालेल्या मनोगत कार्यक्रमात प्रा. डॉ. सोमाजी गोंडाणे, प्राचार्य, राजीव गांधी कला महाविद्यालय, पाटण यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही आणि संविधानिक मार्गाने संघर्ष करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" तसेच स्वामी विवेकानंद यांच्या "उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका" या संदेशांचा उल्लेख करत तरुणांनी शिक्षण, संघटन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदनदादा बोरकर भीम आर्मी उपाध्यक्ष चंद्रपूर यांनी केले. त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला नवी दिशा मिळाल्याचे सांगितले. मधुभाऊ चुनारकर वंचित बहुजन आघाडी सल्लागार चंद्रपूर यांनी कार्यक्रमाचे संचालन करत शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी समाजाने एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. समता सैनिक दलाचे कोरपणा तालुका प्रमुख बादल चांदेकर तसेच अक्षय गोरे यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा व्यक्त केला.
कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे गडचांदूर शहर पदाधिकारी पिंटू रामटेके, समाधान सोनकांबळे, राहुल बोरकर, शरद बोरकर, अमित थोरात, अनिल सूर्यतळ, अनिल दुगे, सुनील दुगे, सुरेश ताडे, तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, भीम आर्मी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. "जय भीम, जय भारत, जय संविधान" या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले आणि कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
0 Comments