तीस वर्षांचा वनवास! कोलगाव-कढोली रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पावसात चिखलाचा तुडवडा, रुग्णवाहिका, शालेय बसही जात नाहीत

राजुरा  : तालुक्यातील कोलगाव ते कढोली हा 5 किमीचा प्रमुख ग्रामीण रस्ता गेल्या 30 वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यामुळे कोलगाव, कढोली, सास्ती, रामनगर, चार्ली, निर्लीसह इतर गावांतील सुमारे हजारोच्या संख्येने लोकसंख्या प्रभावित झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे.

संपूर्ण रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत. ठिकठिकाणी चिखल आणि पाणी साचल्याने दुचाकीस्वार वारंवार घसरून पडत आहेत. रुग्णवाहिका आणि शालेय विद्यार्थी या रस्त्यावरून जाण्यास नकार देत आहेत. त्यामुळे रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना 10 ते 12 किमीचा फेरा मारून जावे लागत आहे.

*शेतकरी आणि विद्यार्थी सर्वाधिक त्रस्त*  
या भागातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र खराब रस्त्यामुळे शेतमाल वेळेवर बाजारात पोहोचत नाही. वाहतूक खर्च वाढला आहे. दुसरीकडे कोलगाव जिल्हा परिषद शाळा आणि कढोली हायस्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज या खड्ड्यातून वाट काढावी लागत आहे.

*ग्रामस्थांचा इशारा*  
जर दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाली नाही तर सर्व गावातील ग्रामस्थ तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आमरण उपोषण करू, असा इशारा कोलगाव-कढोली कृती समितीने दिला आहे. 30 वर्षांपासून मूलभूत रस्त्यासाठी वाट पाहणाऱ्या या नागरिकांना आता तरी न्याय मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.