हद्द ठरली, कब्जा कायम!
कोरपना प्रतिनिधी : मौजा कोडशी खु. येथील गट क्र. ५८ मधील जमिनीची शासकीय मोजणी होऊन सीमा निश्चित झाल्यानंतरही शेजारील शेतकऱ्यांनी जमिनीवरचा कथित कब्जा कायम ठेवल्याचा आरोप शेतकरी नानाजी तुकाराम बोरडे यांनी केला आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास २४ ऑगस्टपासून कोरपणा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ‘बिगर सातबारा शेतकरी संघटने’ने या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, पोलीस ठाण्यातही निवेदन देण्यात आले आहे.
बोरडे यांच्या म्हणण्यानुसार, भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी रजिस्टर क्र. ११७९, दि. २३ मार्च २०२३ अन्वये त्यांच्या जमिनीची अधिकृत मोजणी करण्यात आली. मोजणीनंतरच्या ‘क प्रत’ व नकाशात शेजारील शेतकरी देविदास ठोके व सुभाष मालेकर यांनी बोरडे यांच्या जमिनीवर कब्जा केल्याचे नमूद असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
शासकीय मोजणीचे कागदपत्रे असतानाही कथित कब्जा हटविण्यात आलेला नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर बोरडे यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधितांनी महसूल विभागाची दिशाभूल करून पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
कब्जा तातडीने हटवून न्याय द्यावा, अन्यथा २४ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा ‘बिगर सातबारा शेतकरी संघटने’ने दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलनाची पूर्वकल्पना पोलिसांना देण्यात आली आहे.

0 Comments