काझीपेठ–पुणे रेल्वे लवकरच द्विसाप्ताहिक; झेडआरयूसीसी बैठकीत प्रवासी सुविधांवर भर
हिंदुस्तान न्यूज़ 24: रेखा चंडाले
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपुर
बल्लारपूर : मध्य रेल्वेच्या प्रादेशिक प्रवासी सल्लागार समितीची (ZRUC) १२७ वी बैठक २३ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत प्रवासी सुविधांच्या उन्नतीसह रेल्वे सेवांच्या विस्तारावर सखोल चर्चा करण्यात आली.
झेडआरयूसीसी सदस्य अजय दुबे यांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे काझीपेठ–पुणे रेल्वे संदर्भात महत्त्वाचा निर्णय पुढे आला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या साप्ताहिक गाडीबरोबरच आणखी एक साप्ताहिक गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास काझीपेठ–पुणे मार्गावर द्विसाप्ताहिक सेवा सुरू होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, वाढत्या प्रवासी गर्दीमुळे चंद्रपूर येथून थेट मुंबई व पुणे येथे नवीन रेल्वे सेवा सुरू करणे सध्या शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथून सुरू असलेल्या थेट सेवांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे प्रशासनाने लेखी स्वरूपात नमूद केले.
प्रवाशांच्या सोयीसाठी स्टेशनवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची संख्या वाढवण्यावरही भर देण्यात आला. सहा ऐवजी आठ विक्रेत्यांना परवानगी देण्याच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच अतिरिक्त शुल्क ५ टक्क्यांवरून १ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या प्रस्तावावरही प्रशासनाने अनुकूल भूमिका दर्शवली असून, याबाबत सविस्तर तपासणी करण्यात येणार आहे.
बैठकीदरम्यान अजय दुबे यांनी नवनियुक्त महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांचा सत्कार केला. यावेळी धनंजय महाडिक, अनुप धोत्रे यांच्यासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक व उत्तर प्रदेशातील सुमारे ५१ सदस्य उपस्थित होते. बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांमुळे आगामी काळात प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments