कन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता; पालकांचा आंदोलनाचा इशारा
कोरपना : तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, कन्हाळगाव येथे गणित, विज्ञान व भाषा विषयांच्या शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत २४ जुलै 2026 रोजी झालेल्या पालक सभेच्या निर्णयानुसार पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, सध्या शाळेत केवळ तीन शिक्षक कार्यरत असून त्यामध्ये मुख्याध्यापक आणि दोन सहाय्यक शिक्षकांचा समावेश आहे. यापैकी एक शिक्षक एसआर (विशेष रजा) तर दुसरे वैद्यकीय रजेवर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असून गणित व विज्ञान विषयासाठी एकही शिक्षक उपलब्ध नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन विस्कळीत झाले असून अनेक पालकांनी आपल्या मुलांचे टी.सी. काढण्यास सुरुवात केली आहे. आणखीही शिक्षक उपलब्ध न झाल्यास शाळेला कुलूप ठोकणे, उपोषण करणे तसेच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
पालकांनी प्रशासनाला तातडीने किमान तीन शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अन्यथा शाळा बंद पडल्यास किंवा शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती कोरपना यांना पाठविण्यात आल्या आहेत. गावातील पदाधिकारी सरपंच सुरेखा नवले उपसरपंच विनोद नवले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरज भोयर शिवसेना माजी तालुकाप्रमुख डॉक्टर प्रकाश खनके आधी गावातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अनेकदा पंचायत समिती तक्रारी दाखल केल्यात मात्र त्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. तेव्हा तात्काळ रिक्त पदांचा भरणा करण्यात यावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
0 Comments