पोलिसांची जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; दोन सट्टेबाजांविरुद्ध गुन्हे दाखल.
वरोरा, दि. ६ ऑगस्ट २०२६ : वरोरा पोलिसांनी ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कल्याण सट्टापट्टीच्या जुगारावर कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम १२(अ) अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
पहिल्या कारवाईत टेमुर्डा गावालगत नागपूर–चंद्रपूर महामार्गावरील पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर सट्टापट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून अक्षय मनोहर चांदेकर (वय ३१, रा. टाकळी-खापरी, ता. वरोरा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ₹१,०५० रोख, एक पेन व सट्टापट्टीची चिठ्ठी असा एकूण ₹१,०५५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत खांबाडा गावालगत नागपूर–चंद्रपूर महामार्गावरील पानठेल्यासमोरील रस्त्यावर छापा टाकून अभिजित पांडुरंग सुरसे (वय ४१, मूळ रा. राजूर कॉलरी, ता. वणी, जि. यवतमाळ, सध्या रा. खांबाडा, ता. वरोरा) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ₹१,१२० रोख, एक पेन व सट्टापट्टीची चिठ्ठी असा एकूण ₹१,१२५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवाया पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नोंदविण्यात आल्या असून, पोलीस उपनिरीक्षक अशोक महादेव ढोके हे या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास करीत आहेत.

0 Comments