• वनसडीत पुन्हा अवैध मटक्याचे डोके वर!
• मटका-सट्ट्यावर तत्काळ कारवाई करा; राकेश राठोड यांची कोरपना पोलिसांकडे जोरदार मागणी
कोरपना : कोरपना तालुक्यातील वनसडी परिसरात पुन्हा एकदा अवैध मटका-सट्ट्याचा व्यवसाय सुरू झाल्याचा आरोप पुढे आला आहे. या अवैध धंद्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून, तरुणाईवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वनसडी परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका-सट्ट्यावर तातडीने कारवाई करून त्याला कायमचा आळा घालावा, अशी जोरदार मागणी शिवसेना शिंदे गटाचे कोरपणा तालुकाप्रमुख राकेश राठोड यांनी कोरपना पोलिसांकडे केली आहे.
वनसडी परिसरात काही काळ मटका-सट्ट्याचा प्रकार आटोक्यात असल्याचे चित्र होते. मात्र, आता पुन्हा या अवैध धंद्याने डोके वर काढल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. मटका-सट्ट्याच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट होत असून, अनेक कुटुंबांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राकेश राठोड यांनी कोरपना पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे. वनसडी परिसरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या मटका-सट्ट्याच्या ठिकाणांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच अवैध धंदे पुन्हा सुरू होणार नाहीत यासाठी पोलिसांनी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन वनसडी परिसरात कारवाईचा धडाका सुरू करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अवैध मटका-सट्ट्याला कोणाचे अभय आहे? याचीही चौकशी होण्याची गरज असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
वनसडीतील अवैध मटका-सट्ट्याच्या आरोपांची पोलीस प्रशासनाकडून चौकशी करून सत्यता समोर आणली जाणे गरजेचे आहे. या तक्रारीनंतर कोरपना पोलीस प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते, याकडे वनसडीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 Comments