वरोऱ्यात १.१३ कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या व्यवहाराच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा
वरोरा, दि. २८ जुलै : वरोरा शहरात मालमत्ता व सोन्याचे दागिने विक्रीच्या आमिषाने तब्बल ₹१ कोटी १३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी विनोद सोयाम व त्यांची पत्नी पायल सोयाम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील शिवसागर डेअरीचे व्यावसायिक शिवकुमार रामचंद्रजी गुप्ता (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे त्यांची विनोद सोयाम यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी वरोरा येथील बंगला, तीन प्लॉट, नागपूरमधील मनीषनगर येथील फ्लॅट तसेच सुमारे २०० ग्रॅम सोन्याचे दागिने विकायचे असल्याचे सांगून आरोपीने मालमत्तेचे व्यवहार करण्याची तयारी दर्शविली.
त्यानंतर व्हॉट्सअॅप कॉलद्वारे सातत्याने संपर्क साधत आरोपीने तक्रारदाराला वरोरा येथे येण्यास सांगितले. २७ जुलै रोजी तक्रारदार शिवकुमार गुप्ता हे त्यांचे मित्र रामकृष्णकुमार भुत, अब्दुल सबूर अब्दुल सत्तार व अशोक नंदनवार यांच्यासह वरोरा येथे आले. आरोपीने त्यांना आनंदवन चौक परिसरातून आपल्या घरी नेऊन घर, तीन प्लॉट तसेच नागपूरमधील फ्लॅट यांची माहिती दिली. त्यावेळी आरोपीची पत्नी पायल सोयाम हिलाही उपस्थित करून व्यवहार निश्चित करण्यात आला.
एकूण ₹१,१३,५०,००० रुपयांमध्ये सौदा ठरल्यानंतर तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ₹५६,५०,००० रोख रक्कम आरोपींना दिली. तसेच एचडीएफसी बँकेचे ₹२७ लाख व ₹३० लाख असे एकूण ₹५७ लाखांचे दोन धनादेश (चेक) विनोद सोयाम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
रक्कम स्वीकारल्यानंतर मालमत्तेची कागदपत्रे आणण्याचे सांगून विनोद सोयाम घराच्या आत गेले. मात्र, घराच्या मागील दरवाजातून रोख रक्कम व धनादेश घेऊन पसार झाले. काही वेळाने पायल सोयाम घरी परत आल्या आणि या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.
तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी विनोद सोयाम व पायल सोयाम या दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वेंकय्याजी मित्तरवार करीत आहेत.
0 Comments