#Bhadravti
हिंदुस्थान न्यूज 24 : मनोज मोडक
उपजिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
भद्रावती – तालुक्यातील कुरोडा येथील शेतीसंबंधी प्रकरणात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न करता जाणीवपूर्वक कर्तव्यात कसुरी केल्याने तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी आदेश जारी केले आहेत.
अर्जदार परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (वय ५५, रा. मोरवा) यांनी कुरोडा येथील सर्वे नंबर 86, 87, 95, 98 मधील शेतजमिनीवर 2015 च्या न्यायालयीन आदेशानुसार वारसांची नावे अभिलेखात नोंदविण्याची मागणी केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी न करता प्रकरणात “मालकी हक्काबाबत वाद आहे” असे नमूद करून अर्ज निकाली काढला. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतरही न्याय न मिळाल्याने निराश झालेल्या परमेश्वर मेश्राम यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयात विषप्राशन केले. सध्या ते रुग्णालयात उपचाराधीन असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाने महसूल अधिनियम 1966 आणि महाराष्ट्र नागरी सेवा आचारसंहिता नियम 1969 च्या उल्लंघनाबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले आहे.
🔎 राजेश भांडारकर यांचा कार्यकाळ वादग्रस्त
भांडारकर यांच्या कार्यकाळात अनेक वाद निर्माण झाले. अवैध रेती व मुरूम उत्खनन प्रकरणे, कार्यालयात गैरहजेरी, शेतकऱ्यांच्या लोकअदालतीत अनुपस्थिती, तक्रारी प्रलंबित ठेवणे आणि ग्रामस्थांच्या समस्या न सोडविणे अशा अनेक आरोपांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. नागरिकशास्त्र संरक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल बदकल यांनी त्यांच्या विरोधात अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या.
👉 शेतकरी आत्महत्येच्या प्रयत्नानंतर अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलत दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले असून या प्रकरणाने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
0 Comments