#Ballarpur
• ओलादुष्काळामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी ५०,००० रुपयांची मदत देण्यात यावी – काँग्रेसचा प्रशासनाला आग्रह
हिंदुस्थान न्युज 24: संजय लोहकरे
उपजिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
बल्लारपूर : दिनांक ३ ऑक्टोबर बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ओलादुष्काळाच्या तडाख्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीचा फटका बसला असून, या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत प्रति हेक्टर किमान ५०,००० रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ठाम भूमिका प्रशासनासमोर मांडली.
या मागणीसंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार अजय मलेलवार यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी झालेल्या अनियमित व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे तांदूळ, सोयाबीन, तूर, भाजीपाला आणि इतर पिके पूर्णपणे नष्ट झाली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांच्या या संकटाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्तांना प्रति हेक्टर किमान ५०,००० रुपये मदत द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी, तालुकाध्यक्ष गोविंदा ऊपरे, शहराध्यक्ष देवेंद्र आर्य, तसेच चेतन गेडाम, विनोद आत्राम, वासुदेव येरगुडे, अरुण पेंदोर, नरेश बुरांडे, शेखर आलाम, मंगेश थावरी आणि बंडू पाटील वाढई उपस्थित होते.
तालुका काँग्रेस कमिटीने इशारा दिला आहे की, जर तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
0 Comments