राष्ट्रीय सेवा योजनेतून संस्कार, शिस्त व समाजभान – प्राचार्य डोंगरे व प्रा. नानोटकर यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय सेवा योजनेतून संस्कार, शिस्त व समाजभान – प्राचार्य डोंगरे व प्रा. नानोटकर यांचे प्रतिपादन
हिंदुस्तान न्यूज २४: ग्यानीवंत  गेडाम( उपसंपादक)


वरोरा : लोक शिक्षण संस्था वरोरा द्वारा संचालित लोकमान्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साजरा केला जात आहे. या सप्ताहातील मुख्य कार्यक्रम — राष्ट्रीय सेवा योजना दिन — दिनांक २४ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अनिल डोंगरे (माजी उपाध्यक्ष, लोक शिक्षण संस्था वरोरा) आणि प्रा. अनिल नानोटकर (विभागप्रमुख, अर्थशास्त्र विभाग, लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय वरोरा) यांची उपस्थिती लाभली.
प्रा. अनिल नानोटकर यांनी आपल्या प्रभावी वक्तव्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रम नव्हे तर जीवनाला दिशा देणारी संस्कारशाळा आहे." त्यांनी स्वयंसेवकांमध्ये निर्माण होणाऱ्या स्वयंशिस्त, स्वावलंबन, सामाजिक दायित्व, आणि समाजभान या मूल्यांवर भर दिला.
प्राचार्य अनिल डोंगरे यांनी भाषणात सांगितले की, "संस्कार हे फक्त कुटुंबातच रुजत नाहीत, तर समाजातील शाळा, महाविद्यालयं, आणि स्वयंसेवी संस्था या बाह्य घटकांचाही तितकाच मोठा वाटा आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही तर अशा संस्थांमध्ये अग्रस्थानी आहे." त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रारंभिक काळातील वाटचालही उलगडून दाखवली.
अध्यक्षीय समारोपात प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री यांनी कार्यक्रमाची शिस्तबद्धता आणि स्वयंसेवकांची बांधिलकी यांचे कौतुक करत, "राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि समाजसेवेची भावना वृद्धिंगत होते," असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, स्तवन आणि गोंडवाना विद्यापीठ गीताने झाली, तर समारोप "खरा तो एकची धर्म..." या प्रार्थनेने झाला.
सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत पुरी (सहकार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना), प्रस्ताविक डॉ. रवींद्र शेंडे (कार्यक्रम अधिकारी) यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. रजनीगंधा खिरटकर यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच माजी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments