हिंदूस्थान न्युज 24: पुंडलिक येवले
तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती : गावराळा येथील रहिवासी व नगरपालिका भद्रावतीचे सेवानिवृत्त कर्मचारी राजू उंबरकर यांच्या जमिनीच्या दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या फेरफार प्रकरणाने अखेर निर्णायक वळण घेतले असून, राजकीय हस्तक्षेपानंतर तहसील प्रशासन अक्षरशः हलल्याचे चित्र समोर आले आहे.
उपलब्ध कागदपत्रांच्या सखोल अभ्यासातून असे स्पष्ट होते की, संबंधित गट क्रमांकातील जमिनीच्या व्यवहारासंदर्भात आवश्यक असलेली नोटीस बजावणे, जाहिरनामा प्रसिद्ध करणे, अर्ज सादर करणे, तसेच पूर्वीच्या नोंदींची पूर्तता ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. तरीदेखील फेरफार नोंद मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, यामुळे उंबरकर यांच्यासह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
दरम्यान, दि. ३० मार्च रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी थेट भद्रावती तहसील कार्यालयात धडक देत संबंधित बाबूंना जाब विचारला. कागदोपत्रांची प्रत्यक्ष तपासणी करून “प्रकरण इतक्या काळ का रखडले?” याचा खुलासा मागत त्यांनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून इम्रान खान यांनी तत्काळ महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना दूरध्वनीवरून संपूर्ण माहिती दिली. यानंतर मुनगंटीवार यांनी थेट हस्तक्षेप करत तहसीलदार भद्रावती यांना “फेरफार प्रकरण तात्काळ निकाली काढा” असे स्पष्ट व कठोर आदेश दिले.
“क्षेत्र कोणतेही असो, कार्यकर्त्यांच्या हाकेला मुनगंटीवार धावून येतात,” याची प्रचिती पुन्हा एकदा या घटनेतून दिसून आली.
वरिष्ठ पातळीवरून आदेश मिळताच तहसील प्रशासनात तातडीची हालचाल सुरू झाली. तहसीलदारांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना नियमानुसार फेरफार प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती पुढे आली आहे.
कागदपत्रांनुसार, संबंधित प्रकरणात आधीच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली असताना देखील फाईल प्रलंबित ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा प्रकारच्या दिरंगाईमुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
भद्रावती तहसीलमध्ये यापूर्वीही फेरफार प्रकरणांतील दिरंगाईमुळे गंभीर परिणाम घडले आहेत. विशेषतः शेतकरी परमेश्वर मेश्राम प्रकरणात दीर्घकाळ चाललेल्या टाळाटाळीमुळे टोकाचे पाऊल उचलले गेले होते, ज्यामुळे महसूल यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर उंबरकर प्रकरण अधिक संवेदनशील व महत्त्वाचे ठरत आहे.
आता मुनगंटीवार यांच्या थेट आदेशानंतर व इम्रान खान यांच्या धडक हस्तक्षेपामुळे हे प्रकरण मार्गी लागण्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत असून, उंबरकर यांना त्यांच्या जमिनीचा कायदेशीर हक्क मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असली तरी भविष्यात अशा प्रकारची दिरंगाई होऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे भद्रावती तहसीलमधील फेरफार प्रक्रियेतील त्रुटी, दिरंगाई आणि कामकाजाची पद्धत पुन्हा एकदा चर्चेत आली असून, महसूल यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज स्पष्ट झाली आहे.
0 Comments