हिंदूस्थान न्युज 24 : पुंडलिक येवले
तालुका भद्रावती ,प्रतिनिधी
उच्च शिक्षणाचा मार्ग निवडताना ज्या कोर्समध्ये प्रचंड गर्दी आहे अशा कोर्समध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी सखोल विचार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध मनोवैज्ञानिक, अधिवक्ता व संविधानतज्ञ ॲड. डॉ. सत्यपाल कातकर यांनी केले.
डिफेन्स फॅक्टरी, चांदा येथील हेमा मुजुमदार हॉलमध्ये आयुषी स्पोर्ट्स अकॅडमी, चंद्रपूरचे संयोजक दुर्गराज रामटेके यांच्या वतीने १७ मार्च २०२६ रोजी “दहावी, बारावी आणि डिग्रीनंतर पुढे काय? विद्यार्थ्यांसाठी भविष्याचा मार्ग” या विषयावर मोफत शिक्षण सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारमध्ये ॲड. डॉ. कातकर यांनी विद्यार्थी व पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना त्यांनी देशातील उच्च शिक्षणाच्या उपलब्ध संधींबाबत माहिती देत सांगितले की, सध्या देशात केंद्रीय, राज्य, डीम्ड व खाजगी विद्यापीठांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून विविध कोर्सेसमध्ये लाखो सीट्स उपलब्ध आहेत. मात्र नीट, जेईई, सीईटीसारख्या परीक्षांच्या मागे लागून केवळ जाहिरातींना भुलून विद्यार्थी गर्दीच्या कोर्समध्ये प्रवेश घेत आहेत. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना कोर्सची गुणवत्ता, कालावधी, खर्च व भविष्यातील संधी यांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा पारंपरिक कोर्सेसपुरते मर्यादित न राहता इतर पर्यायांचाही शोध घ्यावा. केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी सीयूईटी परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सुचविले.
यावेळी त्यांनी कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) सारख्या कोर्सेसकडे वळण्याचा सल्ला देत कमी कालावधीत उच्च पगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला ताण-तणाव, नैराश्य आणि आत्महत्यांचे प्रमाण यावर मनोवैज्ञानिक समुपदेशनाने नियंत्रण मिळवता येते, त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी खचून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमात ॲड. डॉ. मधुकर कोटनाके व नगरसेविका सौ. सीमा राकेश पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. सेमिनारला संजय माटे, डॉ. सिद्धांत कातकर, दुर्गराज रामटेके, राकेश पवार, बंडू करमणकर, चंद्रमणी देते, ॲड. अमर फुलझेले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास डिफेन्स परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सेमिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
0 Comments