• १६ ऑक्टोबरला चंद्रपूरला सार्वजनिक सुट्टी द्या – खासदार प्रतिभा धानोरकर यांची आक्रमक मागणी
• धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांकडे लेखी विनंती
चंद्रपूर : १६ ऑक्टोबर १९५६ या दिवशी चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देत ऐतिहासिक सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय लिहिला. मात्र आजही या महत्त्वपूर्ण दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी नसल्याने हजारो भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी १६ ऑक्टोबर या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची आक्रमक मागणी प्रशासनाकडे केली आहे.
या संदर्भात धानोरकर यांनी विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांना लेखी पत्र पाठवून ही लोकहितकारी मागणी तातडीने मान्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, "१६ ऑक्टोबर हा दिवस लाखो अनुयायांसाठी केवळ श्रद्धेचा नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक टप्पा आहे."
देशभरातून आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो आंबेडकरी अनुयायी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर या दिवशी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात. मात्र, सध्या सार्वजनिक सुट्टी नसल्यामुळे सरकारी, निमशासकीय कार्यालयांतील कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील कामगारांना रजा घेणे कठीण जाते. परिणामी, लाखो लोकांना या महत्त्वपूर्ण सोहळ्यात सहभागी होता येत नाही.
"ही गोष्ट केवळ धार्मिक श्रद्धेची नाही, तर सामाजिक सन्मान आणि हक्कांची आहे," असे ठाम मत धानोरकर यांनी व्यक्त केले. त्यांनी प्रशासनाला ही मागणी मान्य करून १६ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाने जर ही मागणी मान्य केली, तर भाविकांना शांततेने, मनोभावे आणि मोठ्या उत्साहात दीक्षाभूमीवर येण्यास व डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यास मदत होईल, असा विश्वासही धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments