क्रिएटिव्ह चेस असोसिएशन आयोजित अंडर 19 निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न – विजेत्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
हिंदुस्तान न्यूज 24 : ग्यानिवत गेडाम (उपसंपादक)
वरोरा (प्रतिनिधी) : बुद्धिबळ या मेंदूला चालना देणाऱ्या खेळात ग्रामीण भागातील खेळाडूंनी यशाची चमक दाखवत पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे. क्रिएटिव्ह चेस असोसिएशन आयोजित अंडर 19 निवड बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी दिशा कॉलेज, वरोरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या स्पर्धेत मुलींच्या गटात रुन्मई पाटील हिने दमदार खेळ सादर करून विजेतेपद मिळवले. तिच्या पालकांनी तिच्या यशाबद्दल अपार समाधान व्यक्त करत मुलीच्या चिकाटीचा गौरव केला. द्वितीय क्रमांकावर इरा वैद्य, तृतीय क्रमांकावर विधी करमरकर तर चतुर्थ क्रमांकावर प्रिन्सी बारई यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
मुलांच्या गटात आदित्य नापल्लीवार याने उत्कृष्ट रणनीती आणि परिपक्व खेळ सादर करून विजेतेपद पटकावले. त्याच्या पालकांनी सातत्यपूर्ण सराव आणि जिद्द हे यशामागील गुपित असल्याचे सांगितले. द्वितीय क्रमांकावर शुभम लांडगे, तृतीय क्रमांकावर चैतन्य शिंदे तर चतुर्थ क्रमांकावर मानस सैनी यांनी स्थान मिळवले.
या सर्व विजेत्यांची नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यशस्वी खेळाडूंच्या पालकांनी आपल्या मुलांच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा अभिमान व्यक्त केला तसेच शाळा, प्रशिक्षक व संघटनांचे मनःपूर्वक आभार मानले.
आर्बिटर म्हणून आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नरेन्द्र गुरुदास कन्नाके यांनी स्पर्धेचे उत्तम संचालन केले. विजेत्यांना सन्मानचिन्हे व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पदके प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल क्रिएटिव्ह चेस असोसिएशनचे अध्यक्ष अश्विन मुसळे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी पालकांचे विशेष कौतुक करताना म्हटले की, “खेळाडूंच्या यशामागे घरातील आधार, त्याग आणि प्रेरणा हेच खरे बळ असते.”
ग्रामीण भागातील या खेळाडूंनी साध्या साध्या परिस्थितीतून सराव करत राज्यस्तरीय पातळीवर निवड मिळवणे ही खरोखरच प्रेरणादायी बाब असून, वरोऱ्याच्या क्रीडाक्षेत्रातील कामगिरीत ही स्पर्धा एक मैलाचा दगड ठरणार आहे.
0 Comments