बांधकामगारांच्या हितासाठी अविरत कार्य करणार – काशिनाथ सिंह

बांधकामगारांच्या हितासाठी अविरत कार्य करणार – काशिनाथ सिंह

 बल्लारपूर : बांधकामगारांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बांधकामगार स्थानिक नियंत्रण समितीच्या सह-अध्यक्षपदी काशिनाथ सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीनंतर त्यांनी. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले.

या भेटीदरम्यान समितीच्या माध्यमातून भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, बांधकामगारांचे नोंदणी अभियान, त्यांना मिळणाऱ्या शासकीय लाभांचा प्रभावी अंमलबजावणी, आरोग्य, शिक्षण, निवास व सुरक्षिततेसंबंधी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बांधकाम क्षेत्रातील कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणी, त्यांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना याबाबतही सकारात्मक संवाद झाला.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काशिनाथ सिंह यांचे अभिनंदन करताना सांगितले की, बांधकामगार हे विकास प्रक्रियेचा कणा असून त्यांच्या हितासाठी समितीने संवेदनशीलपणे आणि प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. समितीच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी नियोजनबद्ध व पारदर्शक कार्य करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

काशिनाथ सिंह यांनी यापूर्वीही विविध सामाजिक व प्रशासकीय समित्यांमध्ये कार्य करत उल्लेखनीय योगदान दिले आहे. आमदार मुनगंटीवार यांचे ते निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असून सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या या नियुक्तीचे कामगार वर्गासह सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.

सह-अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काशिनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “बांधकामगारांच्या समस्या, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील. कामगार व जनतेच्या कोणत्याही अडचणी सोडविण्यासाठी समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील.आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बांधकामगार व सर्वसामान्य जनतेच्या सेवेत अविरत कार्य करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments