**पाचवीच्या विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक निरोप; बल्लारपूर नगर परिषद शाळेत भावनिक वातावरण**
📡 *हिंदुस्तान न्यूज़:24*
✍️ **रेखा चंडाले*
बल्लारपूर : नगर परिषद बल्लारपूरद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदी प्राथमिक शाळा (सेमी इंग्रजी), सरदार पटेल प्रभाग येथे गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मधील पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमास नगर परिषद बल्लारपूरचे उपमुख्याधिकारी तथा शिक्षण विभाग प्रमुख रविंद्र भंडारवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुमन प्रजापती, मुख्याध्यापक रामप्रकाश केशकर, पालकवर्ग तसेच चौथी व पाचवीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व भक्तीगीताने करण्यात आली. प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन करण्याचे मार्गदर्शन केले.
यानंतर उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही आपल्या शालेय आठवणी व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, यामुळे वातावरण अधिकच भावुक झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका उषा खरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन घनश्याम पारधी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिनय दत्ता, मिना निषाद, सुष्मिता ब्राह्मणे व दीपा सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments