उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून कचरा डेपोची पाहणी; स्वच्छता व हरितीकरणावर भर

उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून कचरा डेपोची पाहणी; स्वच्छता व हरितीकरणावर भर

हिंदुस्तान न्यूज़ 24:रेखा चंडाले 
जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर 

चंद्रपूर १८ एप्रिल - शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापती यांनी कचरा डेपोची पाहणी केली. यावेळी डेपोमधील कचरा व्यवस्थापन, वर्गीकरण प्रक्रिया, स्वच्छता तसेच नागरिकांना होणाऱ्या संभाव्य त्रासाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेण्यात आला.
   पाहणीदरम्यान उपमहापौर श्री.प्रशांत दानव व स्थायी समिती सभापती सौ. मनस्वी गिऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच डेपो परिसरात स्वच्छता राखण्यासोबतच दुर्गंधी नियंत्रण, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि नियमित उचल यावर विशेष भर देण्याचे निर्देश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले.
  याचबरोबर, डेपो परिसरात लावण्यात आलेल्या झाडांची नियमित व योग्य देखभाल करण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली. तसेच पर्यावरणपूरक दृष्टीकोन ठेवत परिसरात अधिकाधिक वृक्षलागवड करून झाडांची संख्या वाढविण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले.तसेच, येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन व इतर आवश्यक सुविधा वेळेवर व योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत कंत्राटदारास स्पष्ट सूचना देण्यात आल्या.  
  शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी स्वच्छता व्यवस्थेत कुठलीही कमतरता सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
तसेच कचरा प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.
  यावेळी उपायुक्त संदीप चिद्रवार,उपअभियंता रवींद्र कळंबे,अभियंता अतुल भसारकर,नरेंद्र पवार,डॉअमोल शेळके तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments