कार्यशाळा
हिंदुस्तान न्यूज़ 24:रेखा चंडाले
जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर
बल्लारपूर : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या योग्य दिशा मिळाव्यात, त्यांच्या गुणवत्तेला योग्य वाव मिळावा आणि उच्च शिक्षणाच्या संधींबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने बल्लारपूर येथे ‘ज्ञानज्योती’ अभियानांतर्गत भव्य शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता गोंडराजे बल्लाळशाह नाट्यगृह येथे ही कार्यशाळा उत्साहात पार पडणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना स्पर्धात्मक युगात सक्षम बनविण्याचा प्रयत्न या कार्यशाळेतून केला जाणार आहे. ‘आम्ही साथी बहुउद्देशीय संस्था’ आणि स्वयंप्रेरित कार्यकर्ते, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, परिसरातील विद्यार्थी व पालकांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी माजी प्राचार्या प्रकृती पाटील राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून रोहित चुटे उपस्थित राहणार आहेत. विविध मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार असून, त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे.
कार्यशाळेत दहावी, बारावी आणि पदवीनंतरच्या करिअरच्या विविध पर्यायांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कायदा, सामाजिक शास्त्रे, संशोधन क्षेत्र यांसारख्या विविध क्षेत्रांतील संधींचा ऊहापोह करण्यात येणार आहे. NEET, JEE, MH-CET, CUET यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासाचे नियोजन कसे असावे, याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच JNU, दिल्ली विद्यापीठ, TISS, जामिया, मुंबई व पुणे विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अभ्यासक्रमांची माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी देश-विदेशातील संधी, शिष्यवृत्ती योजना आणि परदेशी शिक्षणाच्या शक्यता यांवरही प्रकाश टाकला जाणार आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी, UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे, कर्मचारी निवड आयोग (SSC) यांसारख्या क्षेत्रांतील संधींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध असलेल्या मोफत कोचिंग क्लासेस, शासकीय शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी सहाय्यता निधी याबाबतही सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. एकलव्य निवासी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया आणि त्यातील संधींचा आढावाही घेण्यात येईल.
या कार्यशाळेत नागपूर येथील निलेश नन्नावरे तसेच ‘इरास्मस मुंडस’ शिष्यवृत्तीधारक ॲड. बोधी रामटेके हे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव आणि त्यांचा प्रवास ऐकण्याची संधीही सहभागी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
विद्यार्थी व पालकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, सहभागी विद्यार्थ्यांनी पेन व नोटबुक सोबत आणावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. देणगी शुल्क ऐच्छिक ठेवण्यात आले असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या उपक्रमाची माहिती बल्लारपूर येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी प्रकृती पाटील, बुद्धशिल बहादे, प्रा. रश्मी बारसागडे, रवि मेश्राम, आशाताई ढेंगळे, पौर्णिमा टिपले, अमोल वर्मा ,रोहित चुटे, सुरेश रंगारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
0 Comments