बल्लारपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी, भव्य रॅलीत नागरिकांचा उस्फूर्त सहभाग

बल्लारपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी, भव्य रॅलीत नागरिकांचा उस्फूर्त सहभाग

हिंदूस्थान न्युज 24/संदीप वाघमारे प्रतिनिधी 


बल्लारपूर :  शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने मोठ्या उत्साहात, श्रद्धेने आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरातील गोकुळ नगर वार्ड ते नगर परिषद परिसरापर्यंत भव्य रॅली आणि शोभायात्रा काढण्यात आली. आकर्षक झांकी, ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या तालावर नाचणारे युवक आणि भगव्या ध्वजांनी सजलेली ही रॅली पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले आणि वातावरण शिवमय झाले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी महान विभूतींना अभिवादन करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प केला. त्यानंतर समाजसेवेच्या भावनेतून शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

सायंकाळी गोकुळ नगर वार्ड येथून निघालेली भव्य रॅली हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला. रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सजवलेल्या आकर्षक झांक्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर युवकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. भगवे ध्वज फडकवत दिल्या जाणाऱ्या जयघोषांनी वातावरण पूर्णपणे शिवमय झाले.

ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत नगर परिषद परिसरात पोहोचली. मार्गात अनेक ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोष करत रॅलीचे स्वागत केले. रस्त्यांच्या कडेला तसेच घरांच्या गॅलरीतून नागरिकांनी या ऐतिहासिक शोभायात्रेचे उत्साहात स्वागत केले.

या प्रसंगी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक सिक्की यादव, ज्येष्ठ नेते घनश्याम मूलचंदानी, नगरसेविका रजनी मूलचंदानी, कल्पना गोरघाटे, ज्योती गहलोत, रंजीता बीरे, काजल तोटावार, नगरसेवक मनोज बेले, तालुका प्रमुख प्रकाश पाठक, शहर प्रमुख प्रशांत मेश्राम, महिला शहर प्रमुख ज्योती गहलोत, मीनाक्षी गलगट, युसुफ शेख, सागर राऊत, विनोद बुराडे, प्रभाकर मुरकुटे, सचिन तोटावार, रामू मेदरवार, सुधाकर पोपले, सोनू श्रीवास, अरुण पडाल, आनंद महाकाली, दिलीप नाईक, अशोक पटेल, मलेश जनारम, चिन्नी कलापली, धर्मा बानोत, अरुण पटालरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक सिक्की यादव यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचे शौर्य, स्वाभिमान आणि प्रजाहिताची भावना आजही समाजाला मार्गदर्शन करते. त्यांच्या आदर्शांपासून प्रेरणा घेऊन समाजात एकता, धैर्य आणि राष्ट्रभक्तीची भावना मजबूत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. बल्लारपूर शहरात मागील सुमारे तीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमामुळे शहरात उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर वातावरण पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments