गोंडवाना विसापूर स्थानकावर प्रवाशांचे गळे कोरडे; भर उन्हात पाण्यासाठी दाहीदिशा!
हिंदुस्तान न्यूज़ 24:रेखा चंडाले
जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर
बल्लारपूर :
विसापूर येथील गोंडवाना विसापूर रेल्वे स्थानक परिसरातील पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेला बोरवेल गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. एकीकडे सूर्याचा पारा चाळीशी पार करत असताना, दुसरीकडे रेल्वे स्थानकावरील ही भीषण पाणीटंचाई प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने रेल्वे गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. या स्थानकावरून दररोज सकाळी ६:२२ ची गोंदिया मेमो, ९:२५ ची वर्धा मेमो, दुपारी १३:३० व १४:२० ची गोंदिया मेमो, तसेच सायंकाळी आणि रात्री उशिरापर्यंत मेमो गाड्यांची ये-जा सुरू असते. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवाशांची वर्दळ असतानाही पिण्याच्या पाण्याची साधी सोय नसल्याने वृद्ध, महिला आणि बालकांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेषतः दुपारच्या रखरखत्या उन्हात प्रवाशांना पाणी विकत घेण्यासाठी स्थानकाबाहेर धाव घ्यावी लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १५ दिवसांपासून स्थानकावरील हँडपंप कार्यरत होता. मात्र, परिसरातील भूजल पातळी खालावल्याने बोरवेलने पाणी देणे बंद केले आहे. "पाण्याची पातळी कमी झाल्याने बोरवेल बंद पडली असून, याबाबत रेल्वे प्रशासनाला कल्पना देण्यात आली आहे. लवकरच दुरुस्ती व पर्यायी व्यवस्था करण्यात येईल," असे आश्वासन रेल्वे कंत्राटदार वैभव मेश्राम यांनी दिले आहे.
केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता, रेल्वे प्रशासनाने स्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी आणि शाश्वत व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. उन्हाळ्याचे अजून दोन महिने बाकी असताना जर आताच ही स्थिती असेल, तर मे महिन्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
> *प्रतिक्रिया**
> "रेल्वे स्थानकावर पाणी नसल्याने खूप त्रास होत आहे. गाडीची वाट पाहताना तहान लागल्यास पाणी कोठून प्यावे, असा प्रश्न पडतो. रेल्वेने किमान उन्हाळ्याच्या दिवसात तरी टँकरद्वारे किंवा पर्यायी नळाद्वारे पाणी उपलब्ध करून द्यायला हवे."
एक त्रस्त प्रवासी
0 Comments